पिंपरी : विविध कारणांमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात एकूण ८२९ आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ९१ आत्महत्या झाल्या आहेत. तर सर्वात कमी जुलै महिन्यात आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्येत जशी वाढ होत आहे तशी आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात पिंपरी चिंचवड शहरात ८२९ जणांनी आत्महत्या केली आहे.
यामध्ये सर्वाधिक १३४ आत्महत्येच्या घटना या पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. तर सर्वांत कमी नव्याने सुरू झालेल्या दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या एका आत्महत्येची नोंद आहे. आत्महत्येसाठी विविध कारणे समोर येत आहेत.
सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राहणार्या एका रिक्षा चालकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तर चिखली येथेही सावकाराच्या जाचाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मुलाचा गळा घोटून वडिलांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वडील त्यातून वाचले. तर जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
या कारणामुळे महिलांच्या आत्महत्या अधिक
रागच्या भरात, पती-पत्नी वादातून, हुंडा मागणी केल्यामुळै, कौटुंबिक वाद, सासरच्या त्रासाला कंटाळून, पतीचे अनैतिक संबंध, माहेराहून पैसे आणण्याची मागणी, मुलगा झाला नाही, वांझोटी असणे या कारणावरून अनेक महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
पुरूषांच्या आत्महत्येची कारणे
नैराश्य, कर्ज, रागाच्या भरात, दारू पिऊन, मानसिक त्रास, आजारपणाला कंटाळून, प्रेम संबंध, अनैतिक संबंध, पती-पत्नी वाद, जुगारात पैसे हरल्याच्या कारणावरून, व्याजाच्या पैशातून, आर्थिक/मानसिक त्रास, कामाचे पैसे न देणे या कारणावरून शहरातील अनेक पुरूषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
एकाच दिवशी सात आत्महत्येच्या घटनांची नोद
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २७ जानेवारी २०२५रोजी या एकाच दिवशी सात आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. तर वर्षभराची आकडेवारी लक्षात घेता दर दोन दिवसांची शहरात पाच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. तर महिन्याला सरासरी ७० आत्मत्येच्या घटना घडत आहेत.
गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ८२९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी केवळ ४९ घटनांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. उर्वरित आत्महत्येच्या घटनांमध्ये केवळ आकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.
आकडे बोलतात…
महिना आत्महत्येच्या घटना
जानेवारी ५५
फेब्रुवारी ७७
मार्च ७०
एप्रिल ७७
मे ८४
जून ६३
जुलै ४९
ऑगस्ट ७६
सप्टेंबर ९१
ऑक्टोबर ५६
नोव्हेंबर ६७
डिसेंबर ६४
एकूण ८२९