पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरत आहेत. गुरुवारी देखील शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्यासोबत भाजपा सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशीतील भाजपचे युवक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय वातावरण बदलणार असल्याचे संकेत देत आहे.
मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयात आज, गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, पक्षाचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकजुटीने पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करण्याच्या सूचना केला.
पक्ष प्रवेश घेतलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळवून देण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.