वडगाव मावळ : महाराष्ट्राचा एफडीआयमध्ये ३५ टक्के वाटा आहे, हे पाहता कोरियन कंपन्या महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. सोबतच मोठे गुंतवणूकदार देखील महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लौट्टे समूहाने जागतिक विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठत आंबी (ता. मावळ) येथे उभारलेल्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुनील शेळके, लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे (आरओके) भारतातील राजदूत सियोंग हो ली यांच्या उपस्थित प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्थानिक कोरियन असोसिएशन व समुदाय सदस्य, लौट्टे इंडियाचे व्यवसाय सहकारी – कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना लौट्टे समुहाचे अध्यक्ष डाँग बीन शीन म्हणाले की, लौट्टेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या या सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे.
लौट्टे वेलफूड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल चँग यी म्हणाले की, येथे आमची सर्वात मोठी आईस्क्रीम सुविधा स्थापित करून आम्ही केवळ आमच्या जागतिक कार्याचा विस्तार करत नाही तर, भारतातील हैवमोर आईस्क्रीमचा वारसा अधिक दृढ करत आहोत. हैवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद म्हणाले की, लौट्टे भारताला एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून पाहत असून ही गुंतवणूक भारतातील विकासाच्या सामर्थ्यावर समुहाचा विश्वास दर्शविते.
आंबी येथील प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
हा प्रकल्प जवळपास १५ एकर क्षेत्रात स्थापित होत असून पुढील दोन वर्षात जवळपास १००० लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कंपनीची उत्पादन क्षमता १.५० लाख लीटर प्रतिदिन इतकी असून दोन वर्षांमध्ये ती क्षमता ३.५० लाख लीटर प्रतिदिन इतकी होईल. यात ९ प्रॉडक्शन लाईन्स कार्यरत असणार असून ही संख्या १६ पर्यंत वाढविण्याची योजना आहे. सेकंडरी पॅकेजिंग, उच्च कार्यक्षमता व उच्च उत्पादन गुणवत्तेसाठी हायस्पीड मशीन्स पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक यंत्रणेबरोबर एकीकृत करण्यात आली आहे. एकूण ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प मावळ पर्यायाने राज्यासाठी महत्वाचा आहे.