पिंपरी : अल्पावधी कालावधीत पोस्ट बँक सेवा नागरिकांच्या पसंतीस उतरली. मात्र, या बँक सेवेतील चालू खाते, चेक क्लेरिंग सारख्या काही सेवा मिळविण्यासाठी थेट पुणे येथील इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे पोस्टाच्या या सेवा असूनही त्याचा नागरिकांना फायदा घेता येत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयआयपीबी)मध्ये शून्य पैशांवर चालू खाते उघडले जाते. मात्र, पिंपरी चिंचवडमधील कोणत्याच पोस्टाच्या कार्यालायत ही सेवा दिली जात नाही. तसेच अगोदर .िक्लरिंगसाठी खातेदारांचे चेक स्वीकारले जात होते. मात्र, आता चेकही स्वीकारले जात नाही. चेक क्लेरिंगसाठी व चालू खात्यासाठी थेट पुणे मुख्यालयात जावे लागते. पिंपरी चिंचवड आता स्वतंत्र स्मार्ट सिटी व मेट्रो सिटी झाले असताना पोस्ट खात्याकडून शहरात या सेवा का दिल्या जात नाहीत. असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयआयपीबी) ही भारत सरकारच्या डाक विभागाच्या अंतर्गत एक बँक आहे. ही बँकिंग सेवा भारतीय पोस्टच्या विस्तृत नेटवर्कद्वारे नागरिकांना पुरवते. आयआयपीबीची स्थापना २०१८ मध्ये झाली. बचत खाती, चालू खाती, व्यापारी खाती इत्यादी प्रकारची बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. बचत खात्याला दसादशे ४ टक्के दराने व्याज दिले जाते. तर इतर राष्ट्रीयकृत शासकीय व खासगी बँकेत साधारण १,००० ते ५,००० पर्यंत पैसे मोजावे लागतात. तसेच कमीत कमी तेवढेच पैसे खात्यात शिल्लक ठेवावे लागतात. मात्र, पोस्टात अवघे २०० रुपयात बचत खाते उघडले जाते. शिवाय चेकबुक, एटीएम, डिजिटल बँकींग सेवा मिळते. त्यामुळे पोस्टाच्या बचत खात्यांना पसंती मिळत आहे. लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना मोठ्या प्रमाणात पोस्टात बचत खाती उघडली आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक हा पोस्टाचा स्वतंत्र विभाग असून त्याचे कामकाज पुणे शहर मुख्यालयातून चालते. पोस्टमनला बचत खाते व त्यावरुन मर्चंट खाते उघडण्यासाठी मर्यादित स्वरुपात अधिकार आहेत. चालू खाते सेवा पुणे मुख्यालयात सुरू आहे.
– काळूराम पारखी, जनसंपर्क अधिकारी, भारतीय डाक विभाग.