पिंपरी हक्काचा मतदारसंघही दुरावला

पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने हक्काचा मानला जातो. झोपडपट्टीतील मतदार नेहमीच राष्ट्रवादीला साथ देत आला आहे. आजही सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगररसेवक याच मतदारसंघात आहेत.

लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या पार्थ यांना साथ न दिल्यामुळे हा हक्काचा मतदारसंघही राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे महायुती आणि आघाडीच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. हा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या चुकांमुळेच हातातून निसटला आहे. महापालिका निवडणुकीपासून कोणाच्याही ध्यानात नसलेल्या नेत्यांच्या हाती निवडणुकीची सूत्रे दिल्यामुळे पार्थ यांना या मतदारसंघात 41 हजार 294 मतांची पिछाडी मिळाली.

माजी आमदार अण्णा बनसोडेही आपली जबाबदारी निभाविण्यात कमी पडल्याचेच निकालावरून पुढे आले आहे. ज्या चुका त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या चुकांची पुनरावृत्ती लोकसभेच्या निमित्ताने पहावयास मिळाली. झोपडपट्टीतील मतदारांना गृहित धरण्याची चूकही पवारांना महागात पडली. बारणे यांना या मतदारसंघात 1 लाख 3 हजार 232 मते पडली तर केवळ 61 हजार 941 मते पार्थ यांना पडली. पिंपरीतून राष्ट्रवादीने किमान 40 हजारांचे मताधिक्‍य घेणे अपेक्षित असताना तितक्‍याच मतांची पिछाडी धोक्‍याचे ठरणारे आहे. चुकांची पुनरावृत्ती टाळून विधानसभा निवडणुकीची तयारी न केल्यास हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या हातून जाणार हे निश्‍चित.

 

Leave A Reply

Your email address will not be published.