नाणे मावळ : सिमेंटच्या जंगलामुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे लोकवस्तीतून चिमण्या हद्दपार होत आहेत. खेडेगावात काही ठिकाणी चिमण्या तूरळक प्रमाणात दिसतात. घर बांधताना चिमण्यांसाठीही इवलीशी जागा सोडून त्यांची व्यवस्था लावली तर मात्र सर्वत्र चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू होईल, असे कळकळीचे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.
आपण दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करतो. गेल्या ३० वर्षांत चिमण्यांची संख्या कमालीची रोडावली आहे. शहरातून चिमण्या गायब होण्याचे प्रमाण ७० टक्के, तर ग्रामीण भागात ४० टक्के आहे. चिमण्या जिथे नाहीत तो प्रदेश पर्यावरणाच्या दृष्टीने निरोगी मानला जात नाही.
आपण आपल्या घराच्या बाहेरील भागामध्ये भितींमध्ये दोन तीन इंची छिद्र करून ठेवले तरी तिथे चिमण्या आनंदाने राहतील. घराच्या अंगणात स्वदेशी प्रजातीची झुडपे झाडे लावल्यास चिमण्यांना निवारा मिळू शकेल, असे पक्षी मित्र दक्ष काटकर यांनी सांगितले.
चिमणी संवर्धन काळाची गरज
चिमणी मिश्राहारी आहे. गवताचे बी, धान्य कचरा, तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या कानसा मधील दाणे, घराच्या बाजूला पडलेले खरकटे अन्न, कचराकुंडीतील किडे, परसबागेतील झाडांवरच्या अळ्या, कीड, पाकोळ्या, पतंग तसेच पिकांमधील कीटक, टोळ, नागतोडे खाऊन चिमणी आपल्याला मदत करते. चिमणी नैसर्गिक कीटकनाशक आहे, म्हणून मानवासाठी महत्त्वाची आहे. चिमण्या वाढविणे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.