पिंपरी : दुचाकी बुकींग करण्यासाठी एक लाख ४२ हजार रुपये घेतले. मात्र ती दुचाकी अन्य व्यक्तीला देऊन फसवणूक केली. ही घटना चर्होली येथे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली.
आनंद श्रीधर शिंदे (वय ३२, रा. शितळादेवी मंदिरा शेजारी, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याला आळंदी पोलिसांनी दुसर्या गुन्ह्यात अटक केली आहे. रवींद्र उत्तमनाथ नाथजोगी (वय ३३, रा. डुडुळगाव) यांनी शुक्रवारी (दि. १८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या पत्नीसाठी परीणीती या शोरूममधून दुचाकी बुक केली. त्यासाठी फायनान्सचे कागदपत्र तयार करीत त्यावर फिर्यादी यांच्या स्वाक्षरी घेतल्या.
मात्र फिर्यादी यांच्या नावे असलेल्या गाडीचा ताबा न देता ती गाडी परस्पर अन्य व्यक्तीला देऊन फिर्यादी यांची एक लाख ४२ हजारांची फसवणूक केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.