नाणे मावळ : उन्हाचा तडाखा वाढत असून डोंगर टेकड्यांवरील गवत वाळल्याने डोंगर पांढरे दिसू लागले आहेत. अशात एखाद ठिकाणी निसर्गनिर्मित अथवा मानवी चुकीने आगीची ठिणगी पडल्यास वाळलेले गवत पेटून वणवे भडकत आहेत. डोंगरच्या डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत आहे. नाणे मावळ भागातील अनेक डोंगर असे वणव्याच्या आगीत होरपळल्याने काळवंडलेले दिसत आहेत.
गेल्या काही दिवसात नाणे मावळात वणव्याच्या लहान मोठ्या घटना घडल्या आहेत. वणव्याची झळ लागल्याने जंगलातील वनसंपत्ती नष्ट होत आहे. सोबत अनेक दुर्मिळ झाडे, वन औषधी वनस्पती, रानमेवा हेही नष्ट होत आहेत. सोबत लहान सहान पशू-पक्षी यांचे जीवन उद्धवस्त होत आहे. यामुळे वणव्यांपासून डोंगरांचे संरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ग्रामीण भागात रब्बी हंगामातील वाटाना, मसूर ही पिके काढणीला आली आहेत. ह्या पिकांच्या काढणीनंतर शेतकरी शेतीची मशागत करून पुढील पिकाच्या पेरणीपूर्वी जमिनीची भाजणी करीत आहेत. ह्यावेळी जमीन भाजताना पेटवलेल्या पाळापाचोळ्यातून एखादी ठिणगी जवळच्या डोंगरात, जंगलात अथवा वाळलेल्या गवतावर पडून वणवे लागण्याच्या दुर्घटना घडत असून शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.