पीएमपीने हद्दीबाहेरील दैनंदिन, मासिक पास बंद केले
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बससेवा सुरू केली आहे. सध्या एसटी सेवा सुरळीत नसल्याने याचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शहराच्या हद्दीबाहेर सुरू केलेल्या बससेवेबद्दल नागरिकांनी विशेषत: नोकरदार आणि व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला. परंतु काही दिवसातच पीएमपीने हद्दीबाहेरील नागरिकांसाठी दैनंदिन 70 रुपयांचा तर मासिक 1400 रुपयांचा पास शुक्रवार (दि.1) पासून बंद केला आहे.
महापालिका हद्दीबाहेर पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. पीएमपीएमएल ग्रामीण भागात अनेक बस सुरू केल्या आहेत. मात्र, आता तोटा होत असल्याने कारण सांगून पास बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक नोकरी, व्यवसायासाठी शहरात रोज येतात. सध्या इंधनाचे दर वाढल्याने बहुतेक नागरिकांसाठी पीएमपी बससेवा सुरक्षित आणि उपयुक्त ठरत आहे. अशातच पीएमपीने पास बंद करुन ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक फटका दिला आहे.
सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांपुरतीच मर्यादित असलेल्या बससेवेचा ग्रामीण भागतही विस्तार करण्यात आला. लोणावळा, आंबेगाव, जुन्नरपर्यंत पीएमपी बस सेवा सुरू झाली. ग्रामीण भागातून शहरात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांचा या सेवेला चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र, 70 रुपयांमध्ये दिवसभर तर 1400 रुपयांच्या मासिक पासामध्ये महिनाभर संपूर्ण पीएमपीएमलच्या संचलन क्षेत्रात प्रवास करता येत होता.
पीएमआरडीए हद्दीत व ग्रामीण भागात एसटी बसेसच्या तिकीट दरापेक्षा पीएमपीएमलचे तिकीट दर कमी आहेत. हे मार्ग लांब असल्याने तिकीट उत्त्पन्न महामंडळास कमी होत असल्याचे कारण देत आणि तोटा कमी करण्यासाठी पीएमपीएमएलने तिकीट दरात बदल केला. एसटी महामंडळाच्या तिकीट दर आकारणीनुसार प्रति किलो मीटर 1.46 रुपयांप्रमाणे तिकीट दर केला. याशिवाय दैनंदिन 70 रुपयांचा आणि मासिक 1400 रुपयांचा पास बंद केला आहे. वितरीत केलेल्या मासिक पासाची मुदत संपेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
पीएमपीएमएलचा ग्रामीण, शहरी भागासाठी असलेला दैनंदिन 70 रुपयांचा आणि मासिक 1400 रुपयांचा पास बंद केला आहे. केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फिरण्यासाठी दैनंदिन 40 रुपयांचा पास आहे. तर, पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिका हद्दीत फिरण्यासाठी 50 रुपयांचा पास आहे. महापालिका हद्दीबाहेर जाण्यासाठी कोणताही पास नाही. प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. तसेच एसटीपेक्षा पाच रूपये तिकिट दर कमीच आहे.
– राजेश रूपनवर, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक