पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या आवारात दुर्मिळ एलिफंट अॅपल बहरला आहे. या झाडाला साधारणपणे मोठ्या संत्र्याच्या आकाराची फळे लगडली असून, ही फळे मानवी आरोग्यासाठी औषधी आहेत. मात्र या फळांचे औषधी गुणधर्म माहिती नसल्याने पिकलेली फळे झाडावरून पडल्यानंतर ती कोणीही घेऊन जात नसल्याचे चित्र आहे. शहरी भागात हे झाड व फळांविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून आले.
मराठी भाषेत या फळाला करंबळ म्हणतात. तर हत्ती सफरचंदाची वैज्ञानिक नावे डिलेनिया इंडिका, डिलेनिया फिलिपिनेन्सिस, लिमोनिया अॅसिडिसिमा असून, चालता, करंबेल, इंडियन कॅटमन, होंडापारा ट्री, मा-तड या नावानेदेखील हे फळ ओळखले जाते.
भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया, चीन, उष्णकटिबंधीय आशिया, खडकाळ नदीच्या काठी हत्ती सफरचंदाची झाडे आढळतात. हे फळ खाण्यायोग्य असते. हे फळ जंगली हत्तींच्या आवडत्या फळांपैकी एक मानले जाते. स्थानिक वन्य हत्तींमध्ये हे स्वादिष्ट चालता फळ खूप लोकप्रिय आहे आणि ते मोठ्या प्रमाणात खातात. हे फळ आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात देखील वाढते. तर जंगली भागात हत्ती, माकडे आणि हरणांसाठी हे अन्नाचा मुख्य स्रोत आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्रात या फळांची झाडे क्वचितच आढळतात.
एलिफंट अॅपल हे एक सदाहरित मोठे झुडूप किंवा लहान ते मध्यम आकाराचे झाड आहे जे 15 मीटर उंच वाढते. हे मूळचे आग्नेय आशियातील आहे. पूर्वेकडे भारत आणि श्रीलंका ते नैऋत्य चीन आणि व्हिएतनाम आणि दक्षिणेकडे थायलंड ते मलेशिया आणि इंडोनेशिया पर्यंत. पाने 15-36 सेमी लांब आहेत, ज्याचा पृष्ठभाग स्पष्टपणे नालीदार आहे आणि त्यावर बटाट्याच्या चिप्ससारख्या शिरा आहेत.
हे फळ 5-12 सेमी व्यासाचे 15 कार्पल्सचे मिश्रण असते, प्रत्येक कार्पेलमध्ये पाच बिया असतात ज्या एका खाण्यायोग्य लगद्यामध्ये गुंतलेल्या असतात. फळाचा लगदा भारतीय पाककृतींमध्ये करी, जाम आणि जेलीमध्ये वापरला जातो. पानांचा वापर हस्तिदंताला पॉलिश करण्यासाठी केला जातो. टक्कल पडू नये म्हणून टाळूला रस लावला जातो आणि तोंडाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी साल औषधी म्हणून वापरली जाते.
औषधी गुणधर्म
या फळात भारतीय फळ असलेल्या कवठ व बेलासारखा गर चिकट असतो. याची चव तुरट असून, पिकल्यावर फळाची चव गोड असते. तर फळामध्ये ए.सी आणि इ ही तीन व्हिटॅमिन आढळतात. तर कॅरोटीनाईडस् अॅन्टीअॅक्सिडंटसारखे पोषकद्रव्ये असतात. या फळाच्या विविध औषधी गुणधर्मामुळे हे फळ डोळ्यांचे आरोग्य, घसा खवखवणे, किडनीचे आजार तसेच नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.