लोणावळा : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध स्पर्धेमध्ये संध्या वाठोरे व चित्रकला स्पर्धेमध्ये आयान खान यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवले आहेत.
लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.
यावेळी लोणावळा वाहतूक विभागाचे अनिल शिंदे, पवन कराड, सुभाष शिंदे, मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे, देवराम पारिठे, अमजद खान पठाण, पत्रकार विशाल पाडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यसाई कार्तिक म्हणाले, मुलांनी रस्ता सुरक्षा या संवेदनशील विषयात सहभाग घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. आपल्या देशात अपघातात मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण जास्त आहे. याकरिता लहानपणापासून मुलांनी काळजी घेतली पाहिजे.
पोलीस निरीक्षक सुहास जगताप म्हणाले, मुलांनी लहान वयापासून वाहतूक नियमांचे पालन करावे. जेव्हा आपण सज्ञान व्हाल तेव्हा त्या नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहने चालवावी व सुरक्षित प्रवास करावा.
निबंध स्पर्धेत ‘रस्ता सुरक्षा काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी लेखन केले. त्यात संध्या वाठोरे (प्रथम क्रमांक), गायत्री दांडगे (द्वितीय क्रमांक), महिमा मौर्या (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळविले. तर चित्रकला स्पर्धेत ‘विषय रस्ता सुरक्षा संदेश पोस्टर’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. त्यात आयान खान (प्रथम क्रमांक), संध्या वाठोरे (द्वितीय क्रमांक), तनुजा पोकळे (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळविले.