कामशेत : मावळ तालुक्यातील उकसान ग्रामपंचायत हद्दीतील वडीवळे धरण परिसरात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला सूचित करून कारवाई करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर आता विभागाकडून एका अनधिकृत बांधकावर कारवाई करून ते निष्काषित केले आहे. यामुळे धरण हद्दीत अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उकसान ग्रामपंचायत हद्दीमधील गट नंबर ८७/१ मध्ये वडीवळे धरणाच्या हद्दीत धरण संचय पातळीमध्ये विनापरवानगी बांधकाम केले होते. त्याबाबत पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले. यानंतर विभागाने वारंवार नोटीस बजावून संबंधितांना अतिक्रमण हटविण्यास कळविले होते. परंतु, धरण हद्दीतील बांधकाम न हटविल्याने अखेर विभागाच्या अधिकारी यंत्रांच्या सहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कामशेत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
धरण क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेल्या सर्वांना नोटीस बजाविण्यात आली आहे. संबंधितांनी त्वरित त्यांचे अतिक्रमण हटवावे, अन्यथा विभागाकडून अतिक्रमण हटविण्यात येईल. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– संतोष शिंदे, वडीवळे प्रकल्प प्रमुख