पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसर झपाट्याने विकसित होत आहे. जवळच आयटी नगरी म्हणजे हिंजवडी आहे. झपाट्याने विकसित होणार्या या परिसरात गृह खरेदीसाठी आयटीयन्स पसंती देत आहेत. मात्र कामावर जाण्यासाठी या भागातून एकही पीएमपीएमएलची बस नव्हती. याबाबत दै. प्रभातने आयटीयन्सची व्यथा मांडली. पीएमपीएमएल प्रशासनानेही या वृत्ताची दखल घेत हिंजवडी व पिंपरीसाठी नव्याने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रावेत भागामध्ये घर घेण्यासाठी आयटीयन्सची मोठी पसंती आहे. या भागात राहणारे अनेक कर्मचारी हिंजवडी आणि तळवडे भागातील आयटी कंपन्यांमध्ये काम करतात. मात्र हिंजवडी आणि तळवडे भागात कामावर जाण्यासाठी रावेतमधून थेट बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे कर्मचारी वर्गाला हिंजवडीला जाताना प्रथम डांगे चौक आणि तिथून पुढे हिंजवडी असा प्रवास करावा लागत होता. यामुळे प्रवासासाठी जास्तीचे पैसे आणि वेळ तर लागत होता आणि दोन वेळा गाडी बदलावी लागल्यामुळे दमछाक सुद्धा होत होती.
प्रवासी वर्गाची ही व्यथा दै.९ फेब्रुवारी २०२५ रोजी ’प्रभात’ने मांडली होती. तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनीही पीएमपीएमएल प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या बातमीची दखल पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली. रावेतमधून ३७५ क्रमांकाची बस हिंजवडी आणि फेज 3 साठी उपलब्ध करून दिली. तसेच रावेतहून पिंपरीला येण्यासाठी १३ क्रमांकाची बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रावेतमधील प्रवासी यांनी दै. प्रभात व पीएमपीएमएल प्रशासनाचे आभार मानले.