पिंपरी : उद्योजकतेला सक्षम करणे आणि पशुधन अर्थव्यवस्थेत बदल करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोमवार, 13 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात उद्योजकता विकास परिषद-2025 आयोजित करण्यात आली आहे. ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उद्योजक आणि पतपुरवठादारांना सुविधा देणे, भागधारक आणि उदयोन्मुख उद्योजक यांच्यात समन्वय साधुन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियान उद्योजकता विकास कार्यक्रम (एनएलएम-ईडीपी) ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देणे, ज्ञानाची देवाणघेवाण, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) आणि एनएलएम-ईडीपी योजनेच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या पाच प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या एक दिवसीय परिषदेत उद्योजकांचा सत्कार, प्रकल्पांचे दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन, तांत्रिक सत्रांसह विविध सत्रे होणार आहेत. कार्यक्रमात एकुण 1000 उद्योजक, लाभार्थी, शेतकरी,शासकीय अधिकारी आणि उद्योग संघटना सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या आयोजनामुळे योजनांविषयी जनजागृती होईल. परिषदेच्या माध्यमातून योजनेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी कळविले आहे.