पिंपरी :वर्चस्व वादातून सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार; एक जखमी

ओटास्कीम निगडी येथील घटनेमुळे एकच खळबळ

पिंपरी (प्रतिनिधी) – परिसरावर वर्चस्व कोणाचे या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.

आकाश दोडमने (रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किरण खवले नामक सराईत गुन्हेगाराने हा गोळीबार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओटास्कीम, निगडी येथील बिल्डींग नंबर तीनजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

दोडमने आणि खवले यांच्यात परिसरातील वर्चस्ववादातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी रात्री ते दोघे एकमेकांच्या समोर आले. त्याच्यात त्यावेळी भांडण झाले. त्यानंतर खवले याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमने याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमाने याच्या पायाला लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर आरोपी खवले हा घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची विविध पथके रवाना केली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी आपले डोके वर काढले आहे. त्यातून वाहनांची तोडफोड, ऐकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ले करणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यातच वर्चस्ववादातून गोळीबारासारखी घटना घडल्याने शहराची क्राइम सिटीकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.