पिंपरी – स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. यात चार पीडित महिलांची सुटका करून स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे ही कारवाई केली.
आलीम उद्दीन अब्दुल समद (वय 25, रा. वडगाव शेरी रोड, विमाननगर, पुणे, मूळ रा. आसाम), असे अटक केलेल्या स्पा सेंटर मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा मालक असलेल्या महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शनिवारी (दि. 2) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपळे सौदागर येथील एका स्पा सेंटरमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून छापा टाकून कारवाई केली. यात पश्चिम बंगालच्या दोन तसेच महाराष्ट्रीय दोन महिला अशा चार पीडित महिलांची सुटका केली.