पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल पिंपरी-चिंचवडमध्ये यंदा 93.53 टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 4.44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदा मुलींनी निकालात सरशी घेतली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल यंदा 4.63 टक्क्यांनी जास्त म्हणजे 96 टक्के इतका लागला. तर, मुलांना 91.47 टक्क्यांवरच समाधान मानावे लागले.
आज दुपारी एचएससी बोर्डाकडून ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल विद्यार्थ्यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर घरबसल्या ऑनलाइन पाहिला गेला. यंदा बारावीसाठी शहरातून एकूण 17 हजार 389 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 17 हजार 305 जणांनीच परीक्षा दिली. त्यापैकी 16 हजार 186 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या 7 हजार 877 मुलींपैकी 7 हजार 562 मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीत हे प्रमाण 96 टक्के इतके राहिले. तर, 9 हजार 428 मुलांपैकी 8 हजार 624 मुले उत्तीर्ण झाली. टक्केवारीत हे प्रमाण 91.47 टक्के इतके राहिले.
गतवर्षी पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 89.09 टक्के इतका लागला होता. तुलनेत यंदा 93.53 टक्के निकाल लागला. म्हणजे निकालामध्ये 4.44 टक्क्यांनी वाढ झाली. गतवर्षी 93.01 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर, यंदा तब्बल 96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या निकालाचाही टक्का यंदा चांगलाच वाढला आहे. गतवर्षी 85.84 टक्के मुले उत्तीर्ण झाली होती. तर, यंदा 91.47 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.