पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) -वाढते प्रदूषण आणि इंधन दरवाढीचा वाढत्या आलेखामुळे पिंपरी-चिंचवडवासियांचा इलक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे. शहरात गेल्या दोन वर्षांत 19 हजार 558 नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची संख्या झाली आहे. इलक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांमध्ये राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचा दुसरा क्रमांक लागत आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर असलेली भिस्त कमी करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी 2030 पर्यंत 50 टक्क्यांहून अधिक वाहने विजेवर चालणारी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. तसेच इलक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर 12 टक्क्यांवरून 5 टक्यांपर्यंत कमी केला आहे. दुसऱ्या बाजूला इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा ई-वाहने वापरण्याकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे.
दीड वर्षांत 19 हजार ई वाहनांची खरेदी
करोनानंतर आत्ता जनजीवन पूर्वपदावर येत असताना सर्व प्रकारची वाहन खरेदी जोरदार होऊ लागली आहे. दसरा आणि दिवाळीत पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तब्बल 16 हजार 495 वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये ई-वाहनांची संख्या चांगलीच वाढली आहे. शहरात 2021-22 मध्ये 6 हजार 906 ई-वाहनांची नोंद झाली आहे. तर 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या कालावधीत 9 हजार 285 अशा सुमारे दीड वर्षांत 19 हजार 558 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
ई-वाहने पर्यावरणपूरक असल्यामुळे ई-वाहनांसाठी शासन प्रोत्साहन देत आहे. वस्तू आणि सेवा कर कमी केले आहेत. तसेच प्रदूषण मुक्त वाहनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमधील ई-वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड