Pimpri Chinchwad : “त्या’ पोलिसांवर कारवाई होणार

वृद्ध दांपत्यास मारहाण प्रकरण : पोलीस आयुक्‍त कृष्णप्रकाश यांचे संकेत

पिंपरी – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वृद्ध दांपत्यास केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्याला तर ज्येष्ठ महिलेल्या कानाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईचे संकेत पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिले.

कुमार फुके आणि अलका फुके या ज्येष्ठ दांपत्याचे त्यांच्या जावयाशी 17 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोरच भांडण झाले होते. तुमच्या तक्रारी घेतो, असे सांगून पोलिसांनी त्यांना आत नेले. तिथे पोलिसांशी फुके दांपत्याचा वाद झाला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या लहान नातीसमोरच ज्येष्ठ दांपत्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुमार फुके यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली. तर तीन दिवसानंतरही त्यांच्या अंगावरील माराचे वळ कायम होते. तर अलका फुके यांच्या कानाचा पडदा फाटला असून लवकरच त्यांच्या कानावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

याबाबत पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्येष्ठ दांपत्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यासाठी सहायक आयुक्‍त यांना सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या चौकशीचा अहवाल आल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल.

आयुक्‍तांची भेट होऊ न देणाऱ्यांवरही कारवाई…

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार घेऊन पोलीस आयुक्‍तांना भेटण्यासाठी फुके दांपत्य 20 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्‍तालयात आले होते. मात्र तुम्ही एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जा, असे सांगून पोलीस आयुक्‍तांची भेट होऊ दिली नाही. याचीही गंभीर दखल पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी घेतली आहे. त्या दांपत्याला माघारी पाठविणाऱ्या पोलीस आयुक्‍तालयातील त्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.