Acident News : पिंपरी-चिंचवड शहरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात शहरातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे मित्र २७ फेब्रुवारी रोजी फिरण्यासाठी राजस्थानला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, परतीच्या प्रवासादरम्यान दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर त्यांच्या आलिशान टोयोटा फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि तिन्ही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मृत तरुण हे थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.