पिंपरी-चिंचवड : कोट्यवधींच्या विकासकामांची ‘मलई’ कोणी खाल्ली?

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार शेळके यांचा भाजपला टोला

वडगाव मावळ – आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेस सक्षमपणे लढेल. पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हावे. तसेच मावळात 1400 कोटी, तर लांबच पण 700 कोटींची कामे दाखवा, काही कामे झालीच नाही. केवळ बिले काढण्यात आली असून, आगामी काळात “दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, परंतु त्यातील “मलई’ कोणी खाल्ली याचा शोध घेतला जात आहे, असा टोला आमदार सुनील शेळके यांनी भाजपला अर्थात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नाव न घेतला लगावला.

वडगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा शुक्रवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार सुनील शेळके बोलत होते.

या वेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव वायकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, दीपक हुलावळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, उपनगराध्य चंद्रजीत वाघमारे, वैशाली दाभाडे, नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, दत्तात्रय पडवळ, प्रकाश आगळमे, विशाल वहिले, आफताब सय्यद, अतुल राऊत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले की, मावळ तालुक्‍यात विकासाची कामे करण्याची स्पर्धा करणार आहे. जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरघोष निधी आणण्याकरिता प्रयत्नशिल असेन. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी विकास कामाबाबत मागणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मावळात सर्वच निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढल्या जाणार आहेत.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, मावळात राष्ट्रवादीला आमदार सुनील शेळके यांच्यामुळे नवचैतन्य मिळाले आहे. करोना काळात सुनील शेळके यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे. या वेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे म्हणाले की, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करावे.

प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल वहिले व चंद्रजीत वाघमारे यांनी केले. सुभाष जाधव यांनी आभार मानले.

राष्ट्रवादीचे मिशन ‘फिफ्टी’
मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीपैकी 50 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येईल. सक्रीय कार्यकर्त्यांनाच पदे व उमेदवारी दिली जाईल. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून, पक्षात आलेल्यांना मान दिला जाईल; पण निष्ठावंतांना न्याय मिळणारच, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.