यंत्रणा कधी सक्षम होणार : उपचारासाठी जावे लागते पुण्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव व भटक्या जनावरांची मोठी संख्या आहे. परंतु उपचारासाठी महापालिकेचा पशू वैद्यकीय विभाग कामी पडत आहे. मात्र, शहरातील पशू वैद्यकीय विभागाकडे प्राण्यांवर फक्त प्रथमोपचार करण्याचीच यंत्रणा उपलब्ध आहे.
प्राण्याला गंभीर दुखापत झाली किंवा आजारी पडले तर, पशू वैद्यकीय विभागाकडून पुण्यातील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महापालिकेतील पशू वैद्यकीय विभागाची ही अवस्था असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव आणि मोकाट जनावरांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत आहे. तर, 80 हजार मोकाट कुत्री असून, अन्य प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. परंतु प्राण्यांच्या उपचारासाठी नागरिकांना औंध येथील प्राण्याच्या रुग्णालयात जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील मोकाट जनावराच्या दोन जखमी वासरांना वाचवण्यासाठी शहरातील समाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी तसेच कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते.
महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागात वासरांना उपचार न मिळाल्याने त्यांना प्राणाला मुकावे लागले होते. त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. महापालिकेच्या बैठकांमध्ये तो विषय चर्चेसाठी आला परंतु महापालिका प्रशासन यावर काहीच उपाययोजना करताना दिसून येत नाही.
मनुष्यबळाचा अभाव
शहरातील नागरिकांना किरकोळ कारणासाठीसुद्धा औंध रुग्णालयात जावे लागत असल्याने शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. कोट्यवधींचा खर्च केला जात असून, सक्षम यंत्रणा नाही. याबाबत पशू वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पशू वैद्यकीय विभागाकडे पुरेसे कर्मचारी व अधिकारी नसल्याने यंत्रणेवर भार पडत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला अजून 3 पशू वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचाऱ्यांची गरज आहे.