पिंपरी-चिंचवड : महिनाभरात 36 टक्के ज्येष्ठांचे लसीकरण

महापालिकेकेडे 28,250 लसी शिल्लक : उद्यापासून 45 वर्षांपुढील सर्वांनाच मिळणार लस


केवळ 19 टक्‍के दुर्धर रुग्णांना दिली लस

पिंपरी – महापालिकेकडून गेल्या महिनाभरात सुमारे 36 टक्के ज्येष्ठ नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या 45 पेक्षा अधिक वय असलेल्या 19.36 टक्के रुग्णांनाच पालिका आतापर्यंत लस देऊ शकली आहे. गुरूवारपासून (दि. 1) आता 45 वर्ष वयोगटापासून पुढील सर्वांनाच लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आणखी 25 लसीकरण केंद्र वाढविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. परंतु सद्यस्थितीत पालिकेकडे अवघ्या 28,250 लसी शिल्लक आहेत.

महापालिका प्रशासनाकडून शहरामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करला लसीकरण करण्यात आले.

त्यामध्ये पोलीस, सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक, टेक्‍निशियन आदींचा समावेश आहे. 1 मार्चपासून शहरामध्ये 60 वर्ष वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यास सुरूवात झाली. 8 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात झाली.

महापालिकेच्या 46 आणि खासगी 18 लसीकरण केंद्रांवर सध्या करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. शहरामध्ये सोमवारपर्यंत (दि. 29) 1 लाख 27 हजार 238 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर जाऊन पोहचली आहे. वैद्यकीय विभागाकडील माहितीनुसार, शहरामध्ये आजमितीला अंदाजे 1 लाख 80 हजार इतके ज्येष्ठ नागरिक आहेत.

त्यातील 64 हजार 642 ज्येष्ठ नागरिकांना 1 ते 29 मार्च या कालावधीत लसीकरण करण्यात आले आहे. टक्केवारीत हे प्रमाण 35.91 टक्के इतके आहे. म्हणजे ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत महापालिका सध्या काठावर पास झाली आहे.

दुर्धर आजाराचे 45 ते 59 या वयोगटातील रुग्ण अंदाजे 67 हजार 500 आहेत. त्यांचे लसीकरण 8 मार्चपासून सुरू झाल्याने 29 तारखेपर्यंत अवघ्या 22 दिवसांमध्ये 13 हजार 69 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. टक्केवारीत हे प्रमाण 19.36 टक्के इतके अत्यल्प आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दररोज होणारे लसीकरण सरासरी 2 हजार 229 इतके आहे. तर, दुर्धर आजाराच्या रुग्णांचे दररोज होणारे लसीकरण सरासरी 594 इतके आहे.

पुणे मनपाकडून परत मिळाल्या 15 हजार लस
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुणे महापालिकेला 15 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता. पुणे महापालिकेकडून पुन्हा तितक्‍याच लसी पिंपरी-चिंचवड महापालिकेला परत करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडे सध्या 28 हजार 250 इतक्‍या लस शिल्लक आहेत.

शासनाच्या सुचनेनुसार शहरामध्ये 1 एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटापुढील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. लसीकरण करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याने त्यानुसार नव्याने 20 ते 25 लसीकरण केंद्र वाढविण्याचे नियोजन आहे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.