पिंपरी चिंचवड : ठेकेदाराकडून मातीचा पैसा खाण्याचा प्रकार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका ठेकेदाराच्या कामगारांनी आकुर्डी येथे कचरा गाडीत कचरा भरण्याऐवजी माती भरून वजन वाढविण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचा व्हिडीओ दै. प्रभातच्या हाती लागला आहे. या प्रकारामुळे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने महापालिकेची आर्थिक लूट तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. शहरात दररोज सुमारे 1200 टन कचरा निघतो. हा कचरा मोशी येथील कचरा डेपोत टाकला जातो. मोशीत कचरा डेपोत कचरा टाकण्यापूर्वी संबंधित कचरा गाडीचे वजन केले जाते. कचऱ्याच्या वजनानुसार पालिका ठेकेदारांना बिल अदा करत असते.
गुरूवारी (दि.27) रोजी आकुर्डी थरमॅक्स चौकात ठेकेदाराचे कामगार कचरा गाडीत रस्त्याकडेचा कचरा भरण्याऐवजी माती भरत असल्याचा व्हिडीओ दै. प्रभातच्या हाती आला आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास फक्त संबंधित गाडीचे वजन झिरो केले जाईल. त्या गाडीतील कचऱ्याचा एक रूपयाही ठेकेदाराला देण्यात येणार नसल्याचे सांगतात. मात्र, संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार याबाबत बोलत नाही. पालिका अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी संगनमत तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
आकुर्डी थरमॅक्स चौकात कचरा गाडीत माती भरतानाचा व्हिडीओ मिळाला आहे. संबंधित कचरा गाडीचे वजन झिरो करण्यात आले आहे.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त





