पिंपरी-चिंचवड : निर्बंध कडक करा; पण लॉकडाऊन नको

सर्वसामान्यांसह उद्योजकांची भूमिका : आर्थिक चक्र आता कुठे होतेयं गतिमान

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे राज्यातही हळूहळू बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. पुन्हा पूर्ण लॉकडाऊन होण्याच्या शक्‍यतेमुळे सर्वसामान्यांसह हातावर पोट असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. आधी केलेल्या लॉकडाऊनमधून आता कुठे सावरले जात आहोत. पुन्हा लॉकडाऊन केला तर पूर्णतः कोलमडण्याची वेळ येईल. त्यामुळे हवे तर नियम कडक करा मात्र लॉकडाऊन करू नका, अशी भूमिका सर्वसामान्यांसह उद्योजकांमधून व्यक्त होत आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशामध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातीलही सर्व उद्योग-धंदे, बाजारपेठ बंद होत्या. या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू होत्या. अनलॉक झाल्यानंतरही बहुतांश गोष्टींवर निर्बंध होते. सम-विषमचा नियम होता. यामुळे व्यापाऱ्यांचे अर्थिक चक्र बिघडले. तर उद्योग-धंदे बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली.

त्यामधून आता नोव्हेंबर महिना काही प्रमाणात दिलासादायक ठरला असतानाच पुन्हा रुग्णवाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन होणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊन करणार नाही मात्र परिस्थिती पाहून लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने लॉकडाऊनची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.

आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन नागरिकांनीही आपले कर्तव्य लक्षात घेऊन करोना वाढू नये यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्यांना झालेले नुकसान पाहता निर्बंध कडक करावेत, मात्र लॉकडाऊन करू नये असे मत अनेकांनी दैनिक प्रभात कडे व्यक्त केले.

एवढ्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर आता पुन्हा कडक लॉकडाऊन करणे शक्‍य नाही. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. लग्न-समारंभ, सभा यावर कडक निर्बंध घातले पाहिजेत. लग्न समारंभामध्ये शंभर जणांना परवानगी दिली जाते, तिथे दोनशे लोक उपस्थित राहतात. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर होतो. ते टाळायला पाहिजे. बेशिस्त नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे. नियम कडक करण्याची आवश्‍यकता आहे. किंबहुना नियम कडक केले तर चालेल मात्र पुन्हा लॉकडाऊन नको.
– डॉ. अभय तांबिले, सचिव, नॅशनल इंटिग्रेटेड मोडिकल असोसिएशन.


सगळीकडेच रुग्णसंख्या वाढत आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र लॉकडाऊन करून काय साध्य होणार आहे. ज्यावेळी कडक लॉकडाऊन केला होता. त्यावेळीही रुग्णांची संख्या वाढतच होती. त्यामुळे लॉकडाऊन करून विनाकारण अर्थिक चक्राला मंदी आली. त्याचा परिणाम अनेक वर्ष दिसून येणार आहे. आता काम सुरू झाले आहे तर पुन्हा लॉकडाऊन केल्यास आमच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.
– नीलेश डोंगरे, एमआयडीसी कामगार.


लॉकडाऊन केले तर सुरू झालेले उद्योग-धंदे बंद होतील. त्यामुळे त्याचा कामगार व उद्योगांवर परिणाम होईल. पुन्हा लॉकडाऊनची मानसिकताही नागरिकांची राहिलेली नाही. त्यामुळे जरी लॉकडाऊन केले तरी लोक ऐकणार नाहीत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना लॉकडाऊनमध्ये फटका बसला होता. आता हळूहळू कार्यक्रम सुरू केले आहेत. सर्व काळजी घेऊन नागरिक या कार्यक्रमांना हजर राहत आहेत. त्यामुळे आता सुरळित सुरू झाले असताना पुन्हा लॉकडाऊन करणे योग्य नाही.
– पुरुषोत्तम सदाफुले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान


आता लॉकडाऊन करण्यात काही अर्थच नाही. केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो आता कोणीही लॉकडाऊन केला तरी आम्ही विरोधच करणार आहोत. कर्ज काढून अनेक छोट्या उद्योजकांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे. एवढे आठ महिने त्यावर निर्बंधच होते. आता कुठे व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाला तर ते छोटे उद्योजक कोलमडतील.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, लघु उद्योजक संघटना

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.