पिंपरी – घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे आणखी चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, गॅस सिलेंडर, होम थिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाइल फोन व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साहील रमेश नानावत ऊर्फ अल्लु अर्जुन (वय 25, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे), देवदास ऊर्फ दास रमेश नानावत (वय 23, रा. मु. पाथरगाव, पो. कामशेत ता. मावळ जि. पुणे), योगेश नुर सिंह (वय 34, रा. नाकोडा ज्वेलर्स, ता. पौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला.
त्यामध्ये सहा जणांची एक टोळी घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपींनी मागील तीन वर्षांच्या कालावधीत चार साथीदारांसोबत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेले सोने एका सोनाराला विकले आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही अटक केली. यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील सुमारे 48 गुन्हे उघडकीस आले आहेत.