पिंपरी – एक-दोन नव्हे तर तब्बल 200 वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 36 लाख रुपयांच्या 51 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सतत दोन महिने तपास करून साडेचारशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे.
शंकर भीमराव जगले (वय 20, रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष शिवराम घारे (वय 39, रा. ओझर्डे, ता. मावळ), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे गुन्हे घडत असल्याने दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व कर्मचारी यांनी सतत दोन महिने तपास करून साडेचारशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. तसेच आरोपींची माहिती मिळवून वाहनचोरांचा शोध सुरू केला.
तळेगाव दाभाडे येथे दोन संशयित येतात तसेच ते या भागातील राहणारे नाहीत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपी जगले व आरोपी घारे या दोघांना 26 ऑक्टोबरला पकडले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून 51 दुचाकी, एक आटो रिक्षा, एक मोबाइल, असा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी संतोष घारे हा वयाच्या सतराव्या वर्षापासून वाहनचोरी करीत आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर व नाशिक येथे 200 वाहनचोरीचे गुन्हे आरोपी घारे याच्यावर दाखल आहेत. आरोपी शंकर जगले हा देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात तो 2015 पासून फरार होता. त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, वाहनचोरी, मोबाइल चोरी, घरफोडी, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी दुचाकी चोरीसाठी मास्टर चावीचा वापर करीत असत. मौजमजेसाठी गाड्या चोरी करून गहाण ठेवत किंवा विक्री करीत असत.