पिंपरी-चिंचवड : ट्रान्स्फॉर्मरपासून अपघाताचा धोका कायम

Madhuvan

  • महावितरणचा ढिसाळ कारभार ः रोहित्रांना मिळेना कव्हर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात रोहित्रांचा (ट्रान्स्फॉर्मर) स्पोट होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु महावितरण व महापालिका प्रशासन केवळ बैठका घेत आहे. परंतु कार्यवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रोहित्रांपासून अपघाताचा धोका कायम आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना हकनहाक आपला जीव गमवावा लागत आहे. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने शहरवासीयांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्‍त केली आहे.

महापालिका हद्दीतील बहुतांश रोहित्रांना पत्र्याचे सेफ्टी कव्हर बसविण्यात आले नाहीत. बऱ्याच ठिकाणी केवळ एखाद्या दुसऱ्या रोहित्राला असे कव्हर बसविण्यात आले आहेत. दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीने चिखली येथील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती येथे पाहणी केली असता साने चौक ते शिवरकर चौक या साधारण एक किलोमीटरच्या अंतरामध्ये चार ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. हे सर्व ट्रान्स्फॉर्मर रहिवासी भागात आहेत.

तसेच मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती येथील महत्त्वाचा रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला आहेत. त्यामुळे नागरिकांची नेहमी वर्दळ असते. तर काही रोहित्राच्या आजूबाजूला झोपडपट्टी वसलेली आहे. त्यामुळे येथे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला तसेच तरुण या रोहित्राच्या आजूबाजूच्या परिसरात बसलेले असतात. त्यामुळे भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे ज्याप्रमाणे रोहित्राचा स्पोट झाला तशी घटना येथे घडली तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे महावितरणने येथील रोहित्रांना त्वरित सेप्टी कव्हर बसविणे गरजेचे आहे.

तसेच चिखली ते आकुर्डी रस्त्यावर देखील रोहित्रे आहेत. त्यांना देखील सेप्टी कव्हर नसल्याने येथे देखील ये-जा करणाऱ्या व स्थानिक रहिवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महावितरण केवळ शहरात एखादी घटना घडली की जागे होते पुन्हा तिच स्थिती येते. रोहित्रांची अजूनही महावितरणकडून व्यवस्थितरीत्या देखभाल केली जात नाही. शहरात पुन्हा अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी सर्व रोहित्रांना सेप्टी कव्हर बसविणे गरजेचे आहे.

दवाखान्याशेजारीच ट्रान्स्फॉर्मर
म्हेत्रेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथेच साने चौक पोलीस चौकी आहे. त्यामुळे येथे नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच बाजूला झोपडपट्टी असल्याने येथील नागरिक येथील ट्रान्स्फॉर्मरच्या बाजूला असलेल्या पदपथावर येऊन गप्पा मारत बसलेले असतात. रोहित्राच्या गेटवरच पानपट्टी आहे. अशा रहदारीच्या भागात उभारलेल्या ट्रान्स्फॉर्मरची महावितरणने जेवढी काळजी घेणे गरजेचे आहे तेवढी देखभाल घेताना दिसून येत नाहीत. येथील रोहित्राला देखील सेप्टी कव्हर नाही. त्यामुळे रुग्ण, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

सध्या शहरात ज्या रोहित्रांना कव्हर नाही अशा रोहित्रांना कव्हर बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महावितरणचा प्रयत्न असेल. दुर्घटना घडू नयेत यासाठी महावितरण काळजी घेत आहे.
– शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, पिंपरी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.