पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात असलेले शवविच्छेदन गृह अत्याधुनिक स्वरूपात सुरू होणार आहे. जुन्या शवविच्छेदन गृहात एका वेळी चार शवांचे विच्छेदन करण्याची सुविधा आहे. यात सुधारणा करत नव्या इमारतीमध्ये एका वेळी नऊ मृतदेहांचे विच्छेदन करण्याची सोय आहे. कोल्ड स्टोरेज आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी गॅलरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, संग्रहालय अशा विविध सुविधा देखील नव्या इमारतीत असणार आहेत.
रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याचा मृत्यू झाला तर त्याचे शवविच्छेदन करणे गरजेचे असते. कारण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या आजराचे निदान करण्यासाठी किमान 24 तासांचा कालावधी लागतो. त्यापूर्वीच रुग्ण दगावला तर त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करणे गरजचे असते. पूर्वी नगरसेवक त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास शिफारसपत्र देत असत. त्यावर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना स्मशान दाखला मिळत असे. मात्र त्यात सुधारणा करून ती पद्धत बंद करण्यात आली. आता ती प्रक्रिया शवविच्छेदन गृहातून केली जाते.
यामुळे शवविच्छेदन गृहातील कामकाजावर ताण येत आहे. मागील वर्षी या शवविच्छेदन गृहात तीन हजार 884 मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. जुनी इमारत अपुरी पडत असून त्यात अनेक असुविधा येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नवीन सुसज्ज इमारतीचे काम केले जात आहे. मे 2023 पर्यंत वायसीएम येथील शवविच्छेदन गृहाचे कामकाज नवीन इमारतीमधून सुरु होण्याची शक्यता आहे.
शवविच्छेदन गृहात न्यायवैद्यक शास्त्राचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि इतर स्टाफ देण्याची प्रकिया सुरू आहे. त्यांच्यासाठी नव्या इमारतीमध्ये स्वतंत्र दालने असणार आहेत. न्यायवैद्यक शास्त्रातील तज्ज्ञ देखील नेमले जाणार आहेत. कोल्ड स्टोरेजची क्षमता 20 पेट्यांहून वाढवून ती 60 पेट्या एवढी केली जाणार आहे. रुग्णवाहिका आणि नातेवाइकांच्या वाहनांसाठी नव्या इमारतीत पार्किंगची सोय असेल.
नव्या इमारतीत सहा डॉक्टर आणि 16 कर्मचारी असावेत. तसेच सध्या एक फॉरेन्सिक एक्सपर्ट असून चार फॉरेन्सिक एक्सपर्ट असावेत, अशी मागणी केली आहे. फोटोग्राफी, शस्त्र, विषबाधा या संबंधित सखोल माहिती असणारे संग्रहालय असेल. हे संग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खुले राहील. 60 विद्यार्थी क्षमतेचा सेमिनार हॉल असेल. तिथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेमिनार होऊ शकतील. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले मिनी ऑपरेशन थिएटर असेल. या ऍडव्हान्स लर्निंग सेंटर मध्ये विद्यार्थी इन कॅमेरा आपल्या विषयाशी संबंधित शस्त्रक्रिया करू शकतील. ग्रंथालय असेल त्यात फॉरेन्सिक विषयाशी संबंधित पुस्तके, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मासिके आणि इतर प्रकाशने उपलब्ध असतील. याचा फॉरेन्सिक विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. नव्या इमारतीत कामकाज सुरु झाल्यानंतर जुन्या इमारतीमध्ये डी कंपोज बॉडी रूम बनविली जाणार आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांना काही प्रकरणांमध्ये काही तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे लोकांना कमीत कमी त्रास होईल याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन इमारतीमधून शवविच्छेदनाचे कामकाज लवकर सुरू होईल.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय
उत्पन्न मिळणार
कोल्ड स्टोरेज – 120 रुपये प्रति दिवस
मेडिकल कॉलेज – एक लाख 25 हजार डिपॉझिट आणि 20 ते 40 हजार रुपये वार्षिक फी
हॉल, लर्निंग सेंटर भाडे तत्वावर दिले जाणार
नव्या इमारतीतील सुविधा
एकाच वेळी नऊ मृतदेहांचे शवविच्छेदन करता येईल
कोल्ड स्टोरेजची क्षमता – 60 पेट्या
सुसज्ज रेकॉर्ड रूम,
रुग्णवाहिकांसाठी पार्किंग
न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांसाठी स्वतंत्र दालने, संग्रहालय, ग्रंथालय
ऍडव्हान्स लर्निंग सेंटर
प्रशस्त सेमिनार हॉल