पिंपरी – अवघ्या पाच दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळीचा सण सुरू होण्यापूर्वीचा आजचा शेवटचा सुटीचा दिवस असल्यामुळे हजारो नागरिकांनी पिंपरी बाजारपेठेत गर्दी केल्याने आजचा दिवस “सुपरसंडे’ ठरला. आजच्या गर्दीत सर्वांनाच करोनाचा विसर पडल्याचेही पहावयास मिळाले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मार्च महिन्यात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले होते. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. पिंपरी-चिंचवड शहरात सुद्धा टप्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे.
सर्वच ठिकाणी सध्या अनलॉक असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेमध्ये गर्दी करीत आहेत. शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे दिवाळीपुर्व रविवारची सुट्टी साधत नागरिकांनी खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत गर्दी केली होती.
पिंपरी बाजारपेठेत दिवळीनिमित्त किराणा होलसेल दुकाने, कापड, शोभेच्या वस्तू, फटाके, सोने, इलेक्ट्रॉनिक्स व फराळाच्या दुकानात तोबा गर्दी पहावयास मिळाली. गेल्या सात महिन्यांपासून सर्वच व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागला होता. मात्र, दिवाळी निमित्ताने ग्राहक दुकानात गर्दी करत असल्याने व्यापारीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.