पिंपरी चिंचवड : वाहनचोरी रोखण्यात यश की लपवाछपवी?

गेल्या 11 दिवसांत एकाही वाहनचोरीची नोंद नाही


जानेवारी महिन्यात 127 वाहनांची चोरी, 12 वाहनांचा शोध

पिंपरी  – गेल्या 11 दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत एकही वाहन चोरीचा गुन्हा नोंद नाही. यामुळे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे की पोलीस लपवाछपवी करीत आहेत, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद झालेल्या वाहन चोरीने अनलॉक नंतर पुन्हा एकदा डोके वर काढले. प्रत्येक दिवशी पाच ते सहा वाहने चोरीस जात असल्याची नोंद होत होती. मात्र 6 ते 16 फेब्रुवारी दरम्यान शहरातून एकही वाहन चोरीला गेल्याची नोंद झालेली नाही.

अचानक वाहन चोरीला जाण्याचे प्रकार थांबले कसे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. किंवा वाहन चोरीच्या गुन्ह्यांची आकडे पोलिसांकडून लपविली जात नाही ना, अशीही शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. याच महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी पाच वाहने 2 फेब्रुवारी रोजी चार वाहने, 3 फेब्रुवारी रोजी सात वाहने, 4 फेब्रुवारी रोजी पाच वाहने 5 फेब्रुवारी रोजी चार वाहने चोरी गेल्याची नोंद आहे. त्यानंतर वाहने चोरीस गेल्याची नोंदच नाही.

वाहने शोधण्याचे प्रमाण अवघे 22 टक्‍के
याच वर्षी जानेवारी महिन्यात 127 वाहने चोरीस गेल्याची नोंद आहे. यापैकी 12 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून त्याची टक्‍केवारी अवघी नऊ टक्‍के आहे. तर गेल्यावर्षी 2020च्या जानेवारी महिन्यात 128 वाहने चोरीस गेल्याची नोंद आहे. त्यापैकी फक्‍त 14 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्याची टक्‍केवारी अवघी 11 आहे. तर 2020 या वर्षात 974 वाहने चारीस गेल्याबाबत शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 211 वाहनांचा पोलिसांनी शोध लावला असून त्याची टक्‍केवारी अवघी 22 टक्‍के आहे. तर 2019 मध्ये एक हजार 291 वाहने चोरीस गेली आहेत. यापैकी 279 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले असून हे प्रमाण अवघे 21 टक्‍के इतके आहे.

वाहनचोरी विरोधी पथक नाहीच
माजी पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी वाहन चोरी विरोधी पथक स्थापन केले होते. मात्र लॉकडाऊनच्या बंदोबस्तामुळे मनुष्यबळ अपुरे पडू लागल्याने हे पथक बरखास्त करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरही हे पथक कार्यान्वित करण्यात आलेले नाही.

महत्वाच्या गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना मिळावी यासाठी वाहन चोरीच्या गुन्ह्यांची माहिती प्रेसनोटमध्ये देणे बंद केले आहे. वाहन चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि उघडकीसही येत आहे.
– विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.