हिंजवडी – जगात हिंजवडीची ओळख आयटी हब म्हणून आहे. परंतु आयटीनगरीतील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती फुलवल्याने सध्या त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या शेतीची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करून शेतकऱ्याचे कौतुक केले आहे.
सध्या हिंजवडीत जिकडे पाहवे तिकडे उंच उंच बिल्डिंग दिसत आहेत. त्या हिंजवडीत आयटीहब आहे ही सर्वांसाठी आनंदाचीच बाब आहे. परंतु लाल मातीशी आणि शेतीशी नाते जोडून आयटीपार्कमध्ये स्ट्रॉबेरी सोबत अन्य पिके पिकविणे हे आभिमानस्पद व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
खासदार सुळे बुधवारी (दि. 25) मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी हिंजवडीतील स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करून केली. हिंजवडीचे माजी सरपंच मल्हारी साखरे यांनी मुळा नदीकाठी असलेल्या शेतात घेतलेल्या स्ट्राबेरी पिकाची पाहणी केल्यानंतर सुळे यांनी साखरे कुटुंबाचे शेतातील प्रयोगशील काम पाहून समाधान व्यक्त केले.
दौऱ्याच्या सुरुवातीलाच बैलगाडीत बसवून सुळे यांचे हिंजवडीकरांनी जंगी स्वागत केले. मल्हारी साखरे यांनी शेतात पिकवलेला सेंद्रिय भाजीपाला व फळांची सुळे यांना अनोखी भेट दिली.
या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ हगवणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवा नेते सुरेश हुलावळे, युवक अध्यक्ष सागर साखरे, पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल बुचडे, राधिका कोंढरे, आयटीनगरीचे सरपंच सचिन जांभुळकर, माजी सरपंच दत्तात्रय साखरे, विक्रम साखरे, विशाल साखरे, शिवनाथ जांभुळकर, दिलीप हुलावळे, वसंत साखरे, तानाजी हुलावळे, कुंडलिक जांभुळकर, गणपत जगताप, विलास साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रयोगशील शेतीचे कौतुक करताना सुळे म्हणाल्या, एकीकडे आयटी आणि दुसरीकडे शेती हीच तर महाराष्ट्रची शान आहे. आशा शेतकऱ्यांना सर्वांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या वेळी त्यांनी स्ट्रॉबेरीची
चवही चाखली.
फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर
या वेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीतून महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप केले. त्याला प्रत्युत्तर देताना सुळे म्हणाल्या, फडणवीस हे एक सुसंस्कृत माजी मुख्यमंत्री आहेत. परंतु ते एवढे खोटे बोलतात हे पटणार नाही. त्यांनी गृहमंत्री म्हणून सद्या कायदा सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष देण्याऐवजी पुण्यात भरदिवसा गोळीबार घडतो, कोयता गॅंग दहशत माजवते याबाबत चकार शब्द पण काढत नाहीत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ बसून दोन दिवसांत निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या.