पिंपरी चिंचवड : ‘स्थायी’ने उपसूचना घुसवून अंदाजपत्रक फुगविले

आणखी 249 कोटींचा फुगवटा : पालिकेच्या विभागांवर अतिरिक्त भार

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी 2021-22 या अर्थिक वर्षाच्या अंदजापत्रकात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. स्थायी समितीने बुधवारी (दि. 24) या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या अंदाजापत्रकामध्ये उपसूचना घुसवून एकूण 7 हजार 112 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी 249 कोटी रुपयांचा फुगवटा करण्यात आला आहे.

सभापती संतोष लोंढे स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेचा मूळ 5 हजार 588 कोटी रुपयांचा व केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी रूपयांचे अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीने बुधवारी हे अंदाजपत्रक मंजूर करून महासभेकडे मान्यतेसाठी पाठविले.

स्थायी सदस्यांनी 19 उपसूचनांद्वारे 249 कोटी 29 लाख रुपयांची फुगीर वाढ केली आहे. यामध्ये महापौर विकास निधीसाठी दरवर्षी 5 कोटी तरतूद केली जाते. परंतु, यावर्षी 15 कोटींची तरतूद वाढवून दिली जाणार आहे. तसेच, आंबेडकर भवन 10 कोटी, नागरवस्ती विकास योजनांसाठी 10 कोटी रुपये आणि इतर विविध प्रभागांमधील कामांसाठी तरतूद वाढविणे, नवीन कामांसाठी तरतूद करण्यासाठी स्थायीत उपसूचना देण्यात आल्या आहेत.

स्थायीच्या या उपसूचनांमुळे अंदजपत्रकामध्ये फुगवटा झाला आहे. आता एकूण 7 हजार 361 कोटींचे हे अंदाजपत्रक झाले आहे. दरम्यान, हा फुगवटा भरून काढण्यासाठी करसंकलन, बांधकाम परवानगीसारख्या विभागावर उत्पन्नाचा अतिरिक्त बोजा टाकण्यात आला आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या उपसूचना पात्र, अपात्र करून हे अंदाजपत्रक महापालिका सभेपुढे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. पालिकेच्या महासभेमध्ये पुन्हा उपसूचनांद्वारे अंदाजपत्रकात बदल होण्याची शक्‍यता आहे.

प्रभागातील रस्ते, सुशोभीकरणासारख्या कामांचा अंतर्भाव करत, कोणतीही करवाढ न करता प्रशासनाने हे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, स्थायी समितीत त्यात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.