फुकट प्रवासाची अफवा खोटी; निम्म्या दराने चार हजार किलोमीटरचा प्रवास
पिंपरी – वयाची 65 वर्ष पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना वर्षातून चार हजार किलोमीटर एसटीचा प्रवास फुकट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा मॅसेज सोशल मिडीयावर फिरत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर येथील आगारात चौकशीसाठी जेष्ठ नागरिक रोज गर्दी करीत आहेत.
पुर्ण नव्हे तर अर्ध्या तिकीटामध्ये चार हजार किलोमिटरचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र आगाराची सुविधा नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे वाहक, आगारातील कर्मचाऱ्यांशी ज्येष्ठांचे खटके उडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
“चार हजार किलोमीटरचा प्रवास मोफत असल्याची निव्वळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. परिवहन महामंडळाची ज्येष्ठांसाठी तिकीट दरात निम्मी सवलत ही योजना असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले स्मार्ट कार्ड नागृरिकांनी काढून घ्यावे व एसटीने प्रवास करावा.
-पल्लवी पाटील, सहायक वाहतूक अधिक्षक, वल्लभनगर आगार.
सोशल मिडीयावर फिरणाऱ्या मेसेजमध्ये 65 वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून एसटीचा चार हजार किलोमीटरचा मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचा मजकूर लिहिलेला आहे. ही सुविधा हवी असल्यास आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, प्रत्यक्ष व्यक्ती व 55 रुपये रक्कम स्विकारली जाणार असून जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे अवाहनही या मॅसेजमध्ये करण्यात आले आहे.
प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही योजना परिवहन महामंडळाने जाहीर केली नसल्याचे वल्लभनगर आगार प्रशासनाने जाहीर केले आहे याऐवजी राज्य शासनाने वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी पहिल्या चार हजार किलोमिटरचा प्रवास निम्म्या रक्कमेवर (तिकीटाच्या) करण्याची सवलत उपलब्ध करून दिली आहे.
अशी आहे स्मार्टकार्ड योजना
वयाची65 वर्ष पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड आगार प्रशासनाकडून दिले जाणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, थमइंप्रेशन व 55 रुपये दर आकारण्यात येणार आहे. हे कार्ड मिळाल्यावर ज्येष्ठ नागरिकाला वर्षात फक्त सुरुवातीलाच 4 हजार किलोमीटर प्रवासाच्या तिकीटावर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. चार हजार किलोमिटरनंतरच्या प्रवासासाठी पूर्ण रक्कम आकारली जाणार आहे.