दोन जखमी : ओटास्कीम निगडी येथील घटनेमुळे खळबळ
पिंपरी – परिसरावर वर्चस्व कोणाचे या वादातून एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीने दुसऱ्या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. तसेच त्याच्या भावाला दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.
आकाश बसवराज दोडमणी (वय 23, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किरण शिवाजी खवळे (वय 28), यश अतुल कदम ऊर्फ रघू (वय 20), विजय शिंदे ऊर्फ चोरगुंड्या (वय 32), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्कीम, निगडी), रोहण चंडालिया (वय 24, रा. जाधववस्ती, रावेत), मनोज हाडे (वय 25, रा. चिखली) आणि त्यांच्या इतर दहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
ओटास्कीम, निगडी येथील रमाई हौसिंग सोसायटीजवळ बुधवारी रात्री फिर्यादी आकाश दोडमणी याचा भाऊ रवी दोडमणी (वय 26) याला आरोपी लाथा-बुक्क्या आणि दगडाने मारहाण करीत होते. फिर्यादी आकाश तिथे गेला असता आरोपींनी “तू तिथच थांब तुला गोळी घालून ठार मारतो, असे म्हणत आकाश याच्यावर गोळीबार केला.
गोळी पायात लागल्याने तो जखमी झाला. आरोपींच्या टोळक्याकडे पिस्तूल, पालघन, कोयता आणि लाकडी बांबू अशी हत्यारे होती. दोडमणी आणि खवळे यांच्यात वर्चस्व वादातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. बुधवारी रात्री ते दोघे एकमेकांच्या समोर आले.
खवळे याने आपल्याजवळील पिस्तुलातून दोडमणी याच्यावर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी दोडमणी याच्या पायाला लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर आरोपी खवळे आणि त्याचे साथीदार पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचत पोलिसांनी कारवाई केली.
निगडी पोलिसांकडून लपवाछपवी
गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र याबाबतची माहिती देण्यास पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी नकार दिला. वाढते गुन्हे कमी करण्याऐवजी पोलीस आता गुन्ह्यांच्या माहितीची लपवाछपवी करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.