पिंपरी-चिंचवड : गुप्तधन सापडले हो ; तांब्याच्या गढव्यात सापडली शेकडो सोन्याची नाणी

  • सव्वा दोन किलोपेक्षा अधिक नाणी 
  • इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील 216 नाणी

पिंपरी – बांधकामासाठी खोदकाम करताना चिखली येथे इतिहास कालीन सोन्याच्या नाण्यांचा गढवा सापडला. 526 ग्रॅमच्या तांब्याच्या गढव्यात सोन्याची तब्बल 216 नाणी सापडली आहेत. इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील या 216 नाण्यांचे वजन 2357 ग्रॅम आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी हे गुप्तधन जप्त केले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली. सलाम सालार खॉं पठाण (रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी) याने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगली आहेत. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पठाण याचे सासरे मुबारक शेख, मेव्हणा इरफान शेख (दोघेही रा. पाथरी, जि. परभणी) हे तीन ते चार महिन्यांपूर्वी मजुरीच्या कामासाठी पठाण याच्याकडे आले होते. ते दोघे चिखली येथील बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. तेथे खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी त्यांनी सदाम पठाण याला दाखवली. दुसऱ्या दिवशी सदाम पठाण व त्याचा मेव्हणा मुबारक शेख यांनी मातीचा ढीग उकरून तांब्याच्या धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी सलाम याच्या घरी आणून ठेवली होती.

चिंचवड : प्राचीन नाणी दाखविताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व पोलीस अधिकारी.

इतिहास कालीन ही नाणी 1720 ते 1750 या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याची पुरातत्त्व विभागाकडून माहिती मिळाली आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी केराप्पा माने, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, दीपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, वसंत खोमणे, विपूल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

वाटपावरून वाद झाल्याने प्रकरण उघडकीस
सापडलेली नाणी कोणी किती घ्यायची यावरून सदाम पठाण आणि शेख यांच्यात वाद झाला. सुमारे तीन महिन्यांपासून वाटपावरून वाद सुरू होता. त्यामुळे पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी नाणी जप्त केली. सोन्याच्या सध्याच्या बाजारभावाने एका नाण्याची किंमत 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र पुरातन असल्याने नाणी मौल्यवान असल्याचे सांगितले जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.