दोघांचा मृत्यू : 81 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन 91 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89600 झाली असून मृतांची संख्या 2209 इतकी झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 91 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेले रुग्ण आळंदी व चाकण येथील रहिवासी आहेत.आतापर्यंत शहरात 89600 रुग्णांची नोंद झाली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत शहरात 716 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 117 रुग्णांचाही समावेश आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या 911 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
आज दिवसभरात 81 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 86529 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 588 संशयित रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 966 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.