पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खांदेपालट

वाहतूक शाखेसह क्राईम युनिट मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ठाणे अंतर्गत तसेच विशेष शाखासह क्राईम युनिटमधील अधिकाऱ्यांचे बदल्या झाल्या आहेत. या बदल्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी काल दि. 14 जून रोजी काढले आहेत.

दोन दिवसापूर्वीच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बढतीवर बदल्या झाल्या आहेत. आता आयुक्‍तालयाच्या अंतर्गत अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांना नव्यानेच पोलीस ठाणे देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे चिखली पोलीस ठाण्यात राजकुमार शिंदे, देहुरोड पोलीस ठाण्यात मनीष कल्याणकर, तळेगाव पोलीस ठाण्यात अमरनाथ वाघमोडे, निगडी पोलीस ठाण्यात सुनिल टोपगे यांची बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेच्या युनिटमध्येही बदल करण्यात आले असून आता गुन्हे शाखेचे पाच वेगवगळे युनिट करण्यात आले आहेत.

चार निरीक्षकांना नवीन पोस्टिंग

आज झालेल्या बदल्यामध्ये चार पोलीस निरीक्षकांना नवीन पोस्टींग मिळालेली आहे. यामध्ये रावेत चौकीसाठी ज्ञानेश्‍वर साबळे, शिरगाव चौकीसाठी नारायण पवार, म्हाळुंगे चौकीसाठी भानुदास जाधव यांच्याकडे अतिरिक्‍त पदभार देण्यात आला आहे. तसेच बावधन चौकीसाठी अजय जोगदंड यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. बदली झालेले सर्व अधिकारी लवकरच आपला पदभार घेणार आहेत.

भोसरी, भोसरी एमआयडीसी व चिखली क्राईम युनिटची जबाबदारी पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पिंपरी, चिंचवड व निगडी युनिटचे काम पोलीस निरीक्षक भानुदास जाधव पाहणार आहेत. तसेच वाकड, िंहंजवडी, सांगवी युनिटसाठी पोलीस निरीक्षक मोहन शिंदे व देहुरोड, तळेगाव व तळेगाव एमआयडीसी साठी पोलीस निरीक्षक सुधाकर काटे हे काम पाहणार आहेत. तर तळेगाव (गुन्हे शाखा) साठी शहाजी पवार हे काम पहाणार आहेत.

याबरोबरच वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. पिंपरी वाहतूक शाखेसाठी पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, चाकणसाठी विठ्ठल कुबडे, आळंदीसाठी शिवाजी गवारे, देहुरोडसाठी सतीश पवार यांची बदली करण्यात आली आहे. तर विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी बाळकृष्ण सावंत यांची बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.