पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण पाठोपाठ सुमारे 130 हेक्टर जागेवरील औताडे-हंडेवाडी येथील टीपी स्कीम राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली आहे. तर डिसेंबर अखेरपर्यंत मांजरी आणि आव्हाळवाडी या आणखी दोन टीपी स्कीमची सर्व प्रक्रिया पूर्ण करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. त्यामुळे पीएमआरडीए’च्या हद्दीत पुढील दोन-तीन महिन्यांत चार टीपी स्कीमची कामे सुरू होण्याची शक्यता आहे.
प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच म्हाळुंगे-माण टीपी स्कीमचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने आणि मध्यंतरी करोना महामारीमुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला होता. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचे काम पीएमआरडीएने स्वत: सुरू केले आहे. तर औताडे-हंडेवाडी येथील टीपी स्कीमची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ती योजना राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार त्यास दोन महिन्यांत मान्यता देण्याचे बंधन आहे. त्यामुळे या योजनेस जानेवारी अखेरपर्यंत मान्यता मिळाल्यानंतर तिची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. याचसह मांजरी-वाल्हेकरवाडी आणि आव्हाळवाडी या दोन्ही नगर रचना योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत लवादामार्फत सुनावणीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर या दोन्ही योजना राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत.
पीएमआरडीए’च्या हद्दीत पुढील दोन-तीन महिन्यांत चार टीपी स्कीमची कामे सुरू होण्याची शक्यता आहे.