बसमध्ये केले जातेय सोशल डिस्टंसिंगचे पालन
पिंपरी (प्रतिनिधी) – लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारपासून (दि. 26) “पीएमपीएमएल’ बस सेवेला सुरुवात झाली. प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी फक्त 21 प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली. त्याशिवाय, बसेसचे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले. बस डेपो आणि बस स्थानकांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. 10 वर्षाखालील लहान मुले आणि 65 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांना मात्र बसमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
पिंपरी-चिंचवड शहर हे नॉन रेडझोनमध्ये असल्याने पीएमपीएमएल बससेवा सोमवारपासून (दि. 26) सुरू केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून शहरामध्ये बससेवेला सुरुवात झाली. सकाळ आणि दुपार पाळीमध्ये प्रत्येकी 80 बस एकूण 30 मार्गांवर सोडण्यात आल्या. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, देहू, हिंजवडी आदी भागातील नागरिकांना या बस सेवेचा फायदा मिळाला. पुणे शहर रेडझोनमध्ये असल्याने केवळ पिंपरी-चिंचवड शहरातच या बस सोडण्यात आल्या. बससाठी निश्चित केलेले दैनिक पास हे प्रवाशांना महागडे वाटत असल्याने ज्या मार्गावर प्रवाशी प्रवास करीत होते तेवढ्याच रकमेचे तिकीट देण्यात आले.
“पिंपरी-चिंचवड शहर हे नॉन रेडझोनमध्ये असल्याने पीएमपीएमएलकडून आज बससेवा सुरू करण्यात आली. पुणे रेडझोनमध्ये असल्याने पुण्यातील मार्गांशी मात्र ही बससेवा जोडली नव्हती. सकाळ आणि दुपार पाळीमध्ये प्रत्येकी 80 बस एकूण 30 मार्गांवर सोडण्यात आल्या. बसमध्ये सोशल डिस्टंसिंगचे काळजीपूर्वक पालन केले जात आहे.”
– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.