लस उपलब्ध असूनही लसीकरणाचा वेग वाढत नाही
प्रशासनही गाफील : अवघ्या दोन हजार करोना योद्ध्यांनाच मिळाला दुसरा डोस
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फ्रंट लाइन वर्कर्सना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. या लसीकरणाची गती मंदावली असून दुसऱ्या डोसाचे नियोजन कोलमडले आहे. आतापर्यंत अवघ्या 2 हजार कोविड योद्ध्यांनाच लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 18 हजार 569 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 30 दिवस उलूटनही करोना लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तिघाजणांना करोनाची बाधा झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत योग्य नियोजन केले नसल्याने दुसऱ्या डोसचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट होत आहे.
वीस हजारांहूनही कमी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच जर वेळेवर महापालिका दोन डोस देऊ शकत नसेल तर नागरिकांचे लसीकरण कसे होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लसीकरणापूर्वी महापालिका, शासकीय असे एकूण 4 हजार 194 डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. तर, खासगी रूग्णालयाच्या 14 हजार 545 जणांनी नोंदणी केली. असे एकूण 18 हजार 739 जणांची नोंदणी केली. त्यापैकी 18 हजार 569 जणांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याचे नियोजन कोलमडले आहे. दहा दिवसांमध्ये फक्त 2 हजार 77 जणांना करोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्येही गेल्या तीन दिवसांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने थोडी वाढ झाली आहे.
शहरामध्ये 16 जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला डोस देण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील 456 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. तर 15 फेब्रुवारीपासून दुसरा डोस देण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे.
दुसरा डोस घेण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. 15 फेब्रुवारी या दिवशी अवघ्या 90 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यानुसार पहिल्या दिवशी 456 जणांनी लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित होते. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर दुसरा डोस देण्यासाठी स्थळासह वेळ संदेशाद्वारे पाठविण्यात येणार होता. मात्र याचे नियोजन कोलमडल्याने लसीच्या दुसऱ्या डोसाचा फुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
लसीकरणासाठी लागतील साडेचार वर्ष
लस उपलब्ध असूनही लसीकरणाचा वेग वाढत नाही. शहराचील लोकसंख्या 27 लाखांच्या घरात आहे. त्यामध्ये 20 वर्षापर्यंतच्या तरुणांना लस देण्यात येणार नाही. 20 ते 80 वर्ष वयोगटातील लोकसंख्या 14 लाख आहे. सध्या दिवसाला आठशे ते नऊशे जणांचे लसीकरण केले जात आहे. हाच वेग राहिला तर वर्षाला 3 लाख 24 हजार जणांना लस देण्यात येईल. म्हणजेच 14 लाख लोकसंख्येला लस देण्यासाठी किमान साडेचार वर्षांचा कालावधी लागेल.
तांत्रिक अडथळे
करोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे आहेत. त्याचा फटका लसीकरणाच्या वेगावर होत आहे. या ऍपमध्ये 18 हजार 739 जणांनी नोंदणी केली आहे.
शहरातील 10 केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. 15 फेब्रुवारीपासून लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत 18 हजार 569 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 2 हजार 77 जणांना दुसरा डोस दिला आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी.