पिंपरी – कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
सरकारच्या या प्रयत्नांना पिंपरी-चिंचवडकरांचे पूर्णपणे सहकार्य मिळत आहे.
आज सकाळी ९ ते ९.३० दरम्यान पिंपरीमध्ये पाहणी केली असता पिंपरीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत.
रस्त्यावर फक्त पोलीस व सफाई कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
पिंपरी बाजापेठेत रविवारी नेहमी गर्दी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे गजबजलेले रस्ते सुने दिसत आहेत.
पिंपरीतील मेडिकल व दावखाने वगळता कापड मार्केट, मोबाईल मार्केट, भाजी मार्केट, फुल मार्केट, माॅल, हाॅटेल, चित्रपटगृहे सर्व बंद आहेत.
पिंपरी रेल्वे स्थानकावरही शुकशकाट दिसत आहे. लोणावळा-पुणे लोकलच्या फे-यासुध्दा बंद आहेत.
तसेच शहरातून जाणा-या जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सकाळीच पीएमपीएमएलच्या काहीच बसेस दिसत आहेत. खाजगी वाहतूक पूर्णत: बंद आहे.
दैनिक प्रभात सर्व पिंपरी-चिंचवडकरांना कोरोना साथ रोखण्यासाठी आगामी काही आठवडे गर्दी टाळण्याचे तसेच देशभरात जे सरकारचे, प्रशासनाचे जे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे. स्वत: बरोबर तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या.