पिंपरी-चिंचवड : खुले प्रदर्शन केंद्र तयार; मात्र चालविण्यास ठेकेदार मिळेना

फेरनिविदा काढूनही अद्याप निर्णय नाही

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने मोशी येथे 20 हेक्‍टर क्षेत्रात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता हे केंद्र उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तब्बल चाळीस कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या खुल्या प्रदर्शन केंद्राला चालविण्यासाठी अजून प्राधिकरणाला ठेकेदार मिळालेला नाही.

मोशी येथे प्राधिकरणाकडून पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात खुल्या प्रदर्शन केंद्राची उभारणी केली आहे. हे काम 21 फेब्रुवारी 2019 ला सुरू झाले. नुकतेच हे काम पूर्ण करण्यात आले आहे.कोविडमुळे केंद्राच्या जागेत उद्योगांना उत्पादित वस्तूंचे किंवा मालाचे प्रदर्शन भरविणे लगेचच शक्‍य नाही. मात्र, भविष्यात हे केंद्र उद्योगांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

अनुभवासाठी निर्णय प्रलंबित
खुले प्रदर्शन केंद्र चालविण्यास देण्यासाठी प्राधिकरणाने कंत्राटदार संस्थांकडून निविदा मागविली होती. मात्र, अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा मागविण्यात आली. दरम्यान, फेरनिविदा मागविल्यानंतरही केंद्र चालविण्याचे अनुभव असलेल्या संस्था मिळत नसल्याने केंद्र कोणाला चालवायला द्यायचे, याबाबतचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. दरम्यान, आता प्राधिकरण सभेत चर्चा करून याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

40 कोटींची कामे
खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी 40 कोटी 22 लाख रुपयांचा खर्च मंजूर आहे. आत्तापर्यंत 37 कोटी 62 लाख रुपयांची देयके कंत्राटदाराला अदा केले आहेत. सुमोर 40 कोटी रुपयांच्या खर्चाने या जागेत 12 आणि 18 मीटर रुंद रस्ते, आयकॉनिक प्रवेशद्वार, 3 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, लॅण्डस्केपिंग, अग्निशामक व्यवस्था, व्हीआयपी विश्रांतीकक्ष, तीन ठिकाणी 3 टॉयलेट ब्लॉक युनिट उभारले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.