पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आता केवळ 269 खड्डे उरल्याचा अजब दावा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर तब्बल 6 हजार 432 खड्डे होते. यापैकी 6 हजार 163 म्हणजे 96 टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच शहरातील सर्वच भागातील खड्डे बुजविण्यास 31 डिसेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
शहर परिसरात दिवाळीपर्यंत पाऊस सुरू होता. यंदा पाऊस लांबल्याने शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्यांमुळे विविध रस्त्यांवर लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. महापालिकेने आवश्यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्सने खड्डे भरले आहेत. इतर ठिकाणी मुरूम, खडी तसेच कॉंक्रिटने करून खड्डे बुजविण्याचे काम देखील करण्यात आले आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबरपर्यंत शहरातील 6 हजार 163 खड्डे बुजविण्यात आले आहेत. सध्या शहरात फक्त 269 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र, आजही शहरातील विविध रस्त्यांवरील खड्यांमुळे 269 च्या संख्येबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसेच शाहूनगर येथे रस्त्यावरील खड्यामुळे एका मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. या मुलाच्या मृत्यूला खड्डा दोषी की अन्य काही बाबी याचा पोलीस तपासात समोर येईलच. मात्र, अपघातास खड्डा कारणीभूत नसल्याचाही पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. याबाबत शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, जूनपूर्वी शहरात 2 हजार 42 खड्डे होते. 1 जून ते 28 नोव्हेंबरपर्यंत शहरात 4 हजार 390 असे 6 हजार 432 खड्डे होते. यापैकी 6 हजार 163 खड्डे बुजविले आहेत.
यंदा पाऊस लांबल्याने शहरातील रस्त्यांवर जास्त खड्डे पडले होते. मात्र, पाऊस थांबताच खड्डे त्वरीत बुजविण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. शहर खड्डेमुक्त होण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक