पिंपरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेची महासभा ऑनलाइन घेण्यात आली. पहिल्यांदाच ऑनलाइन घेतलेल्या या महासभेमध्ये तांत्रिक बाबींमुळे मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे तांत्रिक बाबीमध्ये प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे अज्ञान उघड झाले. एकाचवेळी अनेकांनी माइक चालू ठेवणे, एकाच आयडीवरून तीन ते चार जणांनी सामील होणे यामुळे संपूर्ण महासभेचाच महागोंधळ झाला.
तांत्रिक बाबीत प्रशासनासह लोकप्रतिनिधीही फेल : अवघ्या तासाभरात आटोपली सभा
पिंपरी चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. संपूर्णतः तांत्रिक बाबीवर आधारित असलेल्या या महासभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहयला मिळाला.
महापौरांच्या कक्षातून ऑनलाइन सभेला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. स्थायी समितीच्या कक्षातून काही लोकप्रतिनिधींसाठी ऑनलाइन सहभागी होण्याची सुविधा करण्यात आली होती. तर सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते त्यांच्या कक्षातून या ऑनलाइन सभेत सहभागी झाले.
महापालिकेच्या तांत्रिक विभागाने केलेल्या या सोयीचा पहिल्या मिनिटामध्येच बोजवारा उडाला. सभा सुरू झाल्याच्या पहिल्या मिनिटापासूनच आवाजाची स्पष्टता येत नव्हती. त्यामुळे नेमका कोण काय बोलतोय याचा ताळमेळ लागत नव्हता.
ऑनलाइन बैठकांमध्ये एकावेळी एका व्यक्तीने बोलणे अपेक्षित आहे.
तसेच ज्यावेळी एखादा व्यक्ती बोलत असेल त्यावेळी प्रत्येकांने आपल्या सिस्टीमचा माइक बंद करणे आवश्यक आहे. मात्र, या महासभेमध्ये ज्याला वाटेल ते माइक सुरू करून ठेवत होते. त्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या आवाजाने पूर्णच सिस्टीमचा आवाज जात होता. तसेच एकाच आयडीवरून तीन ते चार लोकप्रतिनिधी बोलत होते. त्यामुळे नेमक कोण बोलत आहे याचा ताळमेळ लागत नव्हता.
महापालिकेने घेतलेल्या या ऑनलाइन महागोंधळी सभेवर लोकप्रतिनिधींनी शेवटी चांगलीच टीका केली. त्यामुळे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या ऑनलाइन सभेचा पुरता फज्जा उडाला. माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ज्यावेळी शहरामध्ये दोन हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या होती, त्यावेळी आपण सभागृहामध्ये महासभा घेतली. आज रुग्णसंख्या सहाशेवर आली असताना आपण ऑनलाइन सभा घेतोय. ही ऑनलाइन सभा फक्त आवाज दाबण्यासाठी घेतली जात आहे. मात्र आजची सभा ऑनलाइन घेण्याऐवजी ती तहकूब करावी लागत होती. नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल कलाटे, संदीप वाघेरे यांनी या चर्चेमध्ये भाग घेत ऑनलाइन सभेचा विरोध केला.
महापौर… मला बोलू द्या!
सभेच्या विषयपत्रिकेवर सहा विषय होते. हे सहा विषय अवघ्या तासाभरात उपसूचनेसह मंजूर करण्यात आले. मात्र, या विषयांना दिलेली उपसूचना कोण वाचत आहे आणि ती काय आहे याबाबत ऑनलाइन सामील झालेल्या लोकप्रतिनिधींना शेवटपर्यंत समजले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ऑनलाइन सभेत उपसूचना मंजूर करून घेतल्या. तर दुसरीकडे अनेक लोकप्रतिनिधींना विविध विषयांवर बोलायचे होते.
त्यांना त्यांच्या प्रभागातील समस्या तसेच शहरातील करोनाची परिस्थिती व येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेबद्दल आपले मत मांडायचे होते. त्यासाठी प्रत्येकजण आपला माइक सुरू करून महापौर मला बोलायचे आहे, बोलण्याची परवानगी द्या असे म्हणत विनंती करत होते. मात्र, महापौरांनी त्यांना बोलण्याची संधी न देताच गोंधळात महासभा उरकती घेतली.