पिंपरी-चिंचवड : बाधितांचा आकडा पुन्हा अडीचशेच्या वर

सात रुग्णांचा मृत्यू; वाढतोय करोना

पिंपरी – दीड महिन्यापासून दैनंदिन करोनाबाधितांचे आकडे घटत होते. परंतु आता पुन्हा एकदा करोनाचा आलेख वाढू लागला आहे. बुधवारी (दि.25) बऱ्याच दिवसांनंतर करोनाबाधितांचा आकडा अडीचशेच्या पुढे गेला आहे. बुधवारी शहरातील 246 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 9 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या 91284 इतकी झाली आहे.

बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच रुग्ण हे शहरातील आहेत, तर दोन रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये करोनामुळे शहरातील 1601 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 664 अशा एकूण 2265 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सप्टेंबरमध्ये शहरातील एक हजाराच्या पुढे पोहोचलेली दैनंदिन रुग्णवाढ ऑक्‍टोबरमध्ये घटण्यास सुरुवात झाली होती. शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या हळू हळू घटत शंभरच्या देखील खाली गेली होती. दरम्यानच्या काळात चाचणीसाठी दाखल होणाऱ्या संशयितांची संख्या देखील खूप कमी झाली होती. परंतु गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 4464 संशयित चाचणीसाठी दाखल झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांमधील 3905 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1259 संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. अडीचशेहून अधिक रुग्णांची भर पडलेली असताना गेल्या 24 तासांमध्ये केवळ 88 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील 87549 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक
सध्या शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक आहे. रुग्णालयांमध्ये 807 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 134 शहराबाहेरील आहेत. तर तब्बल 1327 रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.