पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडच्या गृहनिर्माण क्षेत्रातील क्रमवारीत प्रथम स्थानावर असणारे पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी भागातील गृहनिर्माण संस्थांकडून घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 चे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. अतिउच्च व अलिशान गृहसंस्थांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारा वर्ग हा उच्चशिक्षित असून देखील त्यांच्याकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे नियम धाब्यावर बसविणा-या 269 सोसायट्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार गृहनिर्माण आस्थापना परिसरातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. या नियमाप्रमाणे 70 पेक्षा अधिक फ्लॅट असणा-या सोसायटीला ही कार्यवाही करणे बंधनकारक आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारा कचरा त्याचठिकाणी वर्गीकरण करुन ओल्या कच-यावर प्रक्रिया करणे नियमाधीन आहे. त्याकरिता गृहनिर्माण संस्थांनी त्याचठिकाणी ओल्या कच-यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत वेळोवेळी पालिकेतर्फे कळविण्यात आले. तरीही, याकडे सासोयटीतील रहिवाशी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
2022 च्या स्वच्छ सर्व्हेक्षणात काही गृहनिर्माण संस्थांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 या नियमाचे उल्लंघन झाल्याचा ठपका पालिकेने संबंधित सोसायट्यांवर ठेवला आहे. पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरातील एकूण 269 हौसिंग सोसायटी व्यवस्थापनाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाकडून नोटिस बजावण्यात आल्या आहेत. यापुढे सोसायटीमध्ये निर्माण होणारा ओला कचरा उचलला जाणार नसून असे वारंवार घडल्यास आपल्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
आकारण्यात येणारा दंड – गृह संस्थादंडाची रक्कम
पहिला प्रसंग – 5,000
दुसरा प्रसंग – 10,000
तिसरा प्रसंग – 15,000
नंतरच्या प्रत्येक प्रसंगी – 15,000