तरुणाचा खून : पत्नीच्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा
पिंपरी – मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेला तरुण घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवीनगर येथील स्कायबे सोसायटीसमोर आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. 22) रोजी सकाळी साठेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.
कुमार तानाजी कसबे (वय 28, रा. कोळेकर निवास, म्हाळुंगे, मुळ रा. काटी, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी, त्याची पत्नी राणी कुमार कसबे (वय-25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, राकेश (रा. बाणेर,) व त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हे शनिवार दि. 20 रोजी दुचाकीवरून बाहेर गेले होते. ते थेट दुसऱ्या दिवशी दुपारी घरी आले, तेव्हा त्यांच्या पत्नीने विचारणा केली असता कुमार यांनी बाणेर येथे राकेश याच्याशी भांडण झाल्याचे सांगितले. तसेच राकेश व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून रात्रभर डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या डोक्यात खूप वेदना होत होत्या. त्यानंतर कुमार झाल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, ते परत आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हाळुंगे येथील शितळादेवी नगरमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी शुक्रवारी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते तपास करत आहेत.