पिंपरी – आई-वडिलांसोबत भाजी खरेदीसाठी गेलेल्या चिमुकल्याच्या गळ्यातील 9 हजार रुपये किंमतीचा 3 ग्रॅमचा सोन्याचा बदाम हिसका मारुन चोरुन नेल्याची घटना रविवारी (दि.7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चिखली येथील कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये घडली.
याप्रकरणी दिव्या रंजन मोहंती (वय 34, रा. सोनीग्रा हाईट्स सोसायटी, टॉवर लाईन त्रिवेणीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर नावाच्या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी दिव्या आपल्या पती आणि मुलगा कबीर सोबत चिखली कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी सागर नावाच्या चोरट्याने कबीर याच्या गळ्यातील 9 हजार रुपये किंमतींचा तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम हिसका मारुन चोरुन नेले. चिखली पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.