पिंपरी-चिंचवड : विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत गृहकलह

साने यांचा ‘नाराजीनामा’ : नाना काटे, जावेद शेख, वैशाली घोडेकर स्पर्धेत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून चांगलाच अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. आपल्याला मुदतवाढ द्यावी या मुद्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने ठाम असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शहर राष्ट्रवादीतील नेते साने यांनी राजीनामा द्यावा या मुद्यावर ठाम आहेत. विरोधी पक्षनेतेपदावरून पक्षांतर्गत कलह निर्माण झालेला असताना ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, जावेद शेख आणि नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी मात्र या पदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

तब्बल 20 वर्षे सत्तेत राहिलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेदच पक्षाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. सध्या या पक्षाकडे गल्लीपासून दिल्लीत एकाही ठिकाणी सत्ता नसतानाही नेते आणि नगरसेवकांमधील मतभेद मात्र कायमच असल्याचे वारंवार समोर येत आहे. पाडापाडीच्या राजकारणात गतवेळी पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर त्यातूनही बोध न घेतलेल्या राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्तेतूनही हद्दपार व्हावे लागले.

एकेकाळी महापालिकेत एकहाती सत्ता राखणाऱ्या या पक्षाचे केवळ 36 नगरसेवक पालिकेत आहेत. मात्र या नगरसेवकांमध्येही एकी नसल्यामुळे सत्ताधारी भाजपाला मनमानी कारभार करण्याची मुभा मिळत आहे. त्यातच पालिकेतील केवळ विरोधी पक्षनेतेपद या पक्षाकडे असल्याने या पदावर आपल्यालाच संधी मिळावी यावरून पक्षांतर्गत कलह टोकाला पोहोचला आहे. काम करणाऱ्या नगरसेवकांना संधी मिळावी या हेतूने राष्ट्रवादीकडून एक वर्षासाठी विरोधी पक्षनेतपदावर संधी देण्यात येत आहे. ज्येष्ठतेच्या मुद्यावरून गतवर्षी योगेश बहल यांना विरोधी पक्षनेते म्हणून संधी देण्यात आली होती. या वर्षभराच्या कालावधी बहल यांनी कोणत्याच मुद्यावर आवाज उठविला नव्हता.

त्यानंतर दत्ता साने यांना या पदावर संधी देण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यकाळात भाजपाशी दोन हात करत राष्ट्रवादीला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यातच त्यांचा कालावधी संपल्याने त्यांच्या जागी दुसऱ्या नगरसेवकाला संधी द्यावी, असा सूर पक्षातील नगरसेवकांमध्ये उमटला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना साने यांचा राजीनामा घ्यावा, अशी सूचना केली होती. वाघरे यांनीही साने यांना दोनवेळा राजीनामा देण्याबाबत सांगितले. मात्र आपणाला दोन महिने आणखी संधी द्यावी, अशी भूमिका साने यांनी घेतल्याने राष्ट्रवादीमधील कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

जातीचे समीकरण ठरणार महत्त्वाचे?

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन महिने उरले आहेत. महापलिकेत सध्या एकाही मुस्लिम सदस्याकडे कोणतेच पद नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जावेद शेख यांचे नाव ऐनवेळी आघाडीवर येण्याची शक्‍यता आहे. तर ओबीसी नगरसेवक व महिला असा निकष विधानसभेसाठी लावला गेल्यास डॉ. वैशाली घोडेकर यांना या पदासाठी अचानकपणे संधी दिली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

साने यांच्या राजीनाम्यामागे अंतर्गत राजकारण असल्याचे सांगितले जात असतानाच पक्षातील तीन इच्छुकांनी नगरसेवकांसह अजित पवार यांच्या गाठीभेटी घेत आपल्यालाच संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. नाना काटे यांच्याबाबतीत अजित पवार हे सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत असताना जावेद शेख यांनी ज्येष्ठतेच्या मुद्यावर आपणाला संधी अशी मागणी केली आहे. तर विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून महिला नगसेवकाला संधी द्यावी या मुद्यावर डॉ. वैशाली घोडेकर यांनी आग्रह धरला आहे. दत्ता साने यांनी चालविलेला नाराजीनामा, गरज पडल्यास पक्षाच्या विरोधात जाण्याची घेतलेली भूमिका आणि एकाच वेळी तीन इच्छुक या प्रकारामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार यातून काय मार्ग काढणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.